पौष्टिक जेवणाने पोलिसांचा उत्साह द्विगुणित

पुणे : गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभारलेल्या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस बांधवांना घरच्यासारखे ताजे, स्वादिष्ट व पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी मिळाले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा, सुरक्षारक्षकांचा आणि पोलीस मित्रांचा बंदोबस्त करण्यातील उत्साह वाढला. तसेच त्यांना ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी केले.
विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम आम्ही गेल्या १७ वर्षापासून राबवत आहोत. जवळपास दीड हजार पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलीस मित्र आणि रांगोळीच्या पायघड्या घालणारे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक यांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ५०० ते ६०० लोक जेवण करतात. घरगुती तीन पोळ्या, मटकीची भाजी, पुलाव, लोणचे व बर्फी आदी पदार्थ यात असतात. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”
फत्तेचंद रांका, माजी प्रांतपाल, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन डहाळे यांनी केले. गेल्या १७ वर्षांपासून हे केंद्र उभारण्यात येते. या प्रसंगी क्लबचे उपप्रांतपाल (प्रथम) परमानंद शर्मा, उपप्रांतपाल (द्वितीय) सुनील चेकर, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, अध्यक्ष अनिल सुगंधी उपस्थित होते.