“उलटे ढेकर देणारे…”, किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांना खोचक टोला

मुंबई | Kishori Pednekar On Ramdas Kadam – शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dasara Melava) आयोजित करण्यावरून शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद सुरू होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तसंच दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्यामुळे कोणाच्या दसरा मेळाव्याल्या किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दोन दसरा मेळावा होत असल्यानं मला दु:ख होत आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यालाच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? भर विधानसभेत ते बोलत होते, ‘माझ्या मुलाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. मी इतके वर्ष शिवसेनेत काम केलं. त्यामुळे मी समाधानी आहे.’ पण नंतर उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम होते. त्यामुळे त्यांनी जिथे जायचं तिथे जावं”, अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांवर केली आहे.
दरम्यान, “यंदा दोन दसरा मेळावा होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला आहे. शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतल्या. कितीतरी यातना आम्ही भोगल्या त्यामुळे दोन मेळावे बघून दु:ख होत आहे”, असं रामदास कदम म्हणाले होते.