अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

सीमोल्लंघन

आज दसरा. त्या निमित्त आमच्या सर्व वाचक आणि हितचिंतकांना दसऱ्याच्या शुभेच्छा! दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या मुहूर्तावर नव्या संकल्पना, संकल्प सिद्धीस जावे याकरता सुरुवात केली जाते. हा मुहूर्त विजय मिळवून देणारा. यशदायी आहे अशी आपली ठाम समजूत, विश्वास आहे. आणि या निमित्तानेच अनेक राजे या मुहूर्तावर सीमोल्लंघन करायचे. आपल्या राज्याच्या सीमा वाढवणे हा त्यांचा उद्देश असायचा. आजच्या काळात हे शक्य नाही आणि कोणी करतही नाही. मात्र सीमा वाढवणे याचा अर्थ आपल्या क्षमता, मर्यादा या सकारात्मक, विधायक पद्धतीने वाढवणे गरजेचे आहे. दसऱ्याच्या निमित्ताने आपल्यातील चांगुलपणा, उत्साह त्याचबरोबर समाजाप्रति जे चांगले पोहोचवता येईल त्यासाठी प्रयत्न करणे याबाबत आपण कार्यरत होणे अपेक्षित आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी किंवा अनैतिकता यातून केवळ आणि केवळ सामाजिक अधःपतनाशिवाय हाताशी काही लागत नाही. आपल्या मर्यादा वाढवणे याचा अर्थ केवळ पोकळ विस्तारवादी भूमिका घेणे असा नाही.

विशेषतः राजकीय पक्षांच्या कृतीबाबत हे अधोरेखित करावेसे वाटते. याचे कारण पक्षांचा विस्तार गरजेचा असतो. कार्यकर्ते वाढवणे आणि अंतिम उद्दिष्ट सत्ता प्राप्त करणे हे आवश्यक असले तरी त्यामागे राजकीय तत्त्वज्ञान विचार आणि रचनात्मक वैचारिक बैठक असणे गरजेचे आहे. केवळ विस्तार म्हणजे वाढणे आणि त्यासाठी नीतिमूल्य आणि तत्त्वांना हरताळ फासणे किंवा त्याचा अवलंबच न करणे असा घेऊ नये. प्रत्येक पक्ष राजकीय विचारांनी आणि सामाजिक कृतींनी परिपक्व होईल तेव्हाच लोकशाहीची पाळेमुळे भक्कम होणार आहेत. पाच राज्यांमध्ये पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.महाराष्ट्रात त्यातील एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा ठाकरेप्रणीत शिवसेनेची असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा विचार करता ही जागा, पक्ष, पक्षचिन्ह या सगळ्यावरून पुन्हा एकदा गदारोळ आणि कोर्टबाजी होणार यात शंका नाही. मुळात न्यायालयात असणारा चिन्ह आणि पक्षाचा मामला अद्याप सुटलेला नाही आणि त्यातच ही निवडणूक असल्यामुळे याचा निकाल राजकारणावर सखोल परिणाम करणारा ठरणार आहे. याचाच अर्थ अशा प्रकारच्या घटनांमधून निघणारा आशय हा पुढील राजकीय घटनांच्या अशा प्रकारच्या परिस्थितीला मार्गदर्शक ठरणारा किंबहुना तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नैतिक मूल्यांची जोपासना करणारा असावा अशी सुज्ञ मंडळी माफक अपेक्षा ठेवतील.

प्रत्येक गोष्ट न्यायालयाच्या माध्यमातून त्यातूनही प्रथम जिल्हा सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय, मग सर्वोच्च न्यायालय त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने वेगळ्या बाजूंनी ते प्रकरण भिजत घोंगडे म्हणून कसे राहील याचा विचार करणे हा लोकशाहीला अभिप्रेत अर्थ नाही. विरोधकांच्या मताचाही आदर होणे म्हणजे लोकशाही होय. मत-मतांतरे असणारच; मात्र ती जनकल्याणासाठी असावीत. केवळ व्यक्तिद्वेष आणि विकासाला खीळ घालणारी नसावी एवढा सारासार विचार करून पक्ष आणि ध्येयधोरणांची सीमोल्लंघनासाठी आखणी व्हावी. संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि एकमेकांप्रति आदर या भावना कधीच संपल्या आहेत. जे मिळेल ते माझ्यासाठी असावे आणि केवळ माझ्या उपयोगी असावे आणि ते मिळवण्यासाठी मी काहीही करावे असा राजकारणाचा नवा सिद्धान्त रुजू पाहत आहे. सर्वच पक्ष या सिद्धान्तामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. देशाच्या भविष्याच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. तेव्हा आपल्या सीमा ओलांडण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे.

त्या सीमा त्यांनी ओलांडाव्यातही. मात्र दरडोई उत्पन्नाची सीमा ओलांडावी, महागाई कमी व्हावी याकरता अर्थपूर्ण प्रयत्नांची सीमा अधिक विस्तृत करावी, विकासाचे क्षितिज हातात येते का, हे पाहण्यासाठी आपल्या मर्यादा व्यापक कराव्यात. त्याचबरोबर सदाचार आणि मूल्याधिष्ठित समाजरचना करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची सीमा ओलांडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या अत्यंत श्रद्धाळू कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा! साडेतीन मुहूर्तांपैकी हा अत्यंत शुभ असणारा मुहूर्त आणि त्या मुहूर्तावर केवळ एक दिवस विचारांचे सोने लुटून चालणार नाही, तर उरलेल्या ३६४ दिवसांमध्ये तशी कृती करणे आणि त्या कृतीला सोन्याची झळाळी आणणे हे व्यष्टी ते समष्टी कर्तव्य आहे, ही भावना या निमित्ताने मनात नक्की करूया.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये