शिक्षणातून समाज निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य
चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
पुणे : शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ आदी उपस्थित होते.
पाटील यांच्या उपस्थितीत राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध विद्यापीठे, राष्ट्रीय, राज्यपातळीवरील शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थासोबत सामजस्य करार करण्यात आले. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.
त्यामुळे शैक्षणिक धोरणातील संकल्पना समजून समाजापर्यंत पोहचिण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होणार आहे. प्रत्येक बाबींचे विश्लेषणात्मक सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणातून मिळणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
डॉ. विनायक यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळीदेशातील आणि राज्यातील अनेक मान्यवर शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
श्रीमती नाथबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालीनी फडणवीस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत भोकरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत, रुसाचे सल्लागार विजय जोशी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.