तिरंदाजांनी केली पदकांची लयलूट

अहमदाबाद : खेलो इंडियातील चॅम्पियन युवा तिरंदाज आदिती स्वामीने सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. विजयादशमीच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय तिरंदाज आदितीने कंपाऊंड टीम आणि वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकाचे लक्ष्य यशस्वीपणे भेदले. दुसरीकडे ओजस देवतळेने कंपाउंडच्या वैयक्तिक गटात रौप्य पदक आपल्या नावावर केले.
आदितीने कंपाउंडच्या वैयक्तिक गटातील फायनल मध्ये दिल्लीच्या युवा खेळाडू प्रगती विरुद्ध महत्त्वपूर्ण झुंज दिली. यामध्ये अचूक लक्ष भेदून आदितीने सुवर्णपदक आपल्या नावे केले. हीच सोनेरी यशाची लय कायम ठेवत तिने आंतरराष्ट्रीय तिरंदाज पूर्वशा शेंडे, मोनाली जाधव आणि मधुरा धामणगावकर यांच्यासोबत सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले.
आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, प्रथमेश जवकर, प्रथमेश फुगे आणि पार्थ कोरडे यांनी अचूक नेम धरून संघासाठी कांस्यपदकाचे लक्ष भेदले. नाशिकचा युवा तिरंदाज कुणाल पवारने अटीतटीच्या लढतीत अचूक पद्धतीने एक्स मारून महाराष्ट्र संघाला कांस्यपदकाचा बहुमान मिळवून दिला.
यासह महाराष्ट्र पुरुष संघ रिकर्व गटात कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र संघाने टाय झालेल्या लढतीमध्ये झारखंडला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने २८-२६ असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघाच्या विजयामध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाज शुकमणी बाबरेकर, गौरव लांबे आणि कुणाल पवार, त्याचसोबत पार्थ साळुंके यांनी मोलाचे योगदान दिले. बुधवारी या युवा तिरंदाजांनी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेत पाचवे पदक जिंकून दिले.
महाराष्ट्राचा अव्वल तिरंदाज गौरव लांबेने पदकांचा डबल धमाका उडविला. त्याने अवघ्या सहा तासाच्या फरकाने महाराष्ट्र संघाला दुसरे पदक जिंकून दिले. गौरव लांबेने आपली सहकारी चारुलता कमलापूरसोबत मिक्स रिकर्व गटात रौप्य पदक जिंकले. यासह महाराष्ट्र संघाच्या नावे तिरंदाजीमध्ये सहाव्या पदकाची नोंद झाली. गौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकर्व गटात कांस्यपदकावर नाव कोरले.
सुवर्णपदकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात अटीतटीची लढत रंगली.
दोन्ही संघांच्या युवा खेळाडूंनी तोडीस तोड कामगिरी करत तीन राउंडमध्ये बरोबरी साधली. त्यानंतर तीन बाण शूटमध्ये ३० पैकी हरियाणाने २८ गुण केले तर महाराष्ट्र २७ गुणांपर्यंत पोहचला. त्यामुळे महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.