“शिवसेनेतून 40 जणांना बाहेर काढणं सोपं नव्हतं त्यासाठी…”, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
मुंबई | Chandrakant Patil – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील सत्तांतरावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत चांगलीच फुट पडली आहे. यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना (Shivsena) पक्ष कधी फुटला यासंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे.
दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असं सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. 40 जणांना बाहेर काढणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणंही महत्त्वाचं होतं. शेवटी ती वेळ साधली गेली आणि आपलं सरकार आणलं, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, मला जेव्हा पक्षानं पुण्यात पाठवलं तेव्हा अनेकांनी मला नावं ठेवली होती. पण तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत यासंदर्भात विचार करण्यात आला होता. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.