ताज्या बातम्यादेश - विदेशराष्ट्रसंचार कनेक्ट

भारत जोडो यात्रेत राहुल-सिद्धरामय्या धावले

नवी दिल्ली : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात्रा सध्या कर्नाटकात आहे. यात गुरुवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उपस्थिती होती. ते राहुल गांधींच्या सोबत चालत होते. त्यानंतर अचानक राहुल गांधी यांनीही त्यांचा हात पकडला आणि धावायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राहुल त्यांचा हात धरून धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हसत हसत राहुल गांधींसोबत पुढे जातात. काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडिओवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्यांना तयारी करून जावे लागणार आहे, असे त्यांनी लिहिले आहे.

कर्नाटक राज्यात पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे कॉंग्रेसची थेट स्पर्धा भाजपशी आहे. त्यामुळेच काँग्रेस या ठिकाणी दिग्गज नेते सिद्धरामय्या आणि माजी कॅबिनेट मंत्री डी. के. शिवकुमार या दोघांना समान महत्त्व देत आहे. दोन्ही नेत्यांमधील संबंध दृढ करून कार्यकर्त्यांमध्ये एकीचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबरला केरळमधून सुरुवात झाली. ३० सप्टेंबरला ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. २१ ऑक्टोबरपर्यंत येथे यात्रा सुरू राहणार आहे. गुरुवारी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधीसह विविध पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पायी प्रवास केला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, सोनिया गांधी यांचे कर्नाटकशी गहिरे नाते आहे. जेव्हा जेव्हा गांधी कुटुंबावर राजकीय संकट आले आहे, तेव्हा दक्षिण भारताने त्यांना सावरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये