‘स्मृतिगंध’मधून विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग माजी विद्यार्थी मेळावा
पुणे : येवलेवाडी येथील केजे शैक्षणिक संकुलात ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांना जोडणारा ‘स्मृतिगंध’ दरवळला. गायन, नृत्यासह विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत, आपल्या वर्गखोल्यांना, संकुलातील विविध कट्ट्यांना भेट देत, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या स्मृतिगंध माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून २५० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी यात सहभागी झाले. महाविद्यालयीन जीवनातील गमतीजमती आठवताना विद्यार्थी भारावून गेले. काही विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. नीलेश उके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक प्रा. बी. आर. वरवटे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.
तसेच माजी विद्यार्थ्यांची संघटनेची चांगली बांधणी करून परस्पर फायद्यासाठी ऋनाणुबंध अधिक मजबूत करावेत, असा सल्ला जाधव यांनी दिला. कार्यकारी संचालक निवृत्त मेजर जनरल समीर कल्ला यांनीही विद्यार्थ्यांना गौरव करत शुभेच्छा दिल्या.
माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल ढवळे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश एस. देशमुख, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. के. बी. गवळी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख दीप्ती डी. कुलकर्णी आणि संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. वाघ यांनी मार्गदर्शन केले.