महाराष्ट्ररणधुमाळी

राजकारणात कसलेला नेता

मुत्सद्दी राजकारण्याचा अंत

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केंद्रीय आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणावर दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि राजकीय आखाड्यातले पट्टीचा मल्ल अशी मुलायमसिंह यांची ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा वेध घेत वाहिलेली श्रद्धांजली.

मुलायमसिंह यादव यांच्या तारुण्याच्या काळात त्यांचा हात प्रतिस्पर्ध्याच्या कंबरेपर्यंत पोहोचला की मग तो कितीही उंच किंवा मजबूत असला तरी मुलायमसिंह त्याच्या पकडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी व्हायचा नाही.मुलायमसिंह यांनी कुस्तीच्या मैदानात जसं भल्या-भल्यांना लोळवलं, तसंच राजकीय आखाड्यातही भल्याभल्यांची गोची केली. शिक्षक झाल्यानंतर त्यांनी कुस्ती सोडून दिली; पण आयुष्याच्या शेवटपर्यंत ते सैफई गावात कुस्त्यांचा हंगाम भरवत राहिले. उत्तर प्रदेशचा मागोवा घेणार्‍या अनेक राजकीय विश्‍लेषकांच्या मते कुस्तीच्या युक्तीमुळे मुलायमसिंह यांना राजकीय पार्श्वभूमी नसतानाही राजकारणाच्या आखाड्यात यश मिळालं.

त्यांच्यातली क्षमता सर्वप्रथम ‘प्रजा सोशालिस्ट पार्टी’चे नेते नाथूसिंह यांनी ओळखली. त्यांनीच मुलायमसिंह यांना १९६७ च्या निवडणुकीत जसवंतनगर विधानसभा जागेसाठी तिकीट मिळवून दिले. त्या वेळी मुलायमसिंह यांचं वय अवघे २८ वर्षे होतं. ते पहिल्याच प्रयत्नात निवडून आले आणि उत्तर प्रदेशच्या इतिहासातले सर्वांत तरुण आमदार ठरले. आमदार झाल्यानंतर त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं. सन १९७७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये रामनरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं तेव्हा मुलायमसिंह सहकारमंत्री झाले. वडील गंभीर आजारी पडल्यानंतर अजितसिंह अमेरिकेतून भारतात परतले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांना पक्षाचा अध्यक्ष बनण्यास भाग पाडलं. यानंतर मुलायमसिंह आणि अजितसिंह यांच्यातलं वैर वाढलं; पण मुलायमसिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

पाच डिसेंबर १९८९ रोजी लखनऊच्या केडी सिंह बाबू स्टेडिअममध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि मुलायमसिंह भावनावश होत अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाले, ‘‘गरीब मुलाला मुख्यमंत्री करण्याचं लोहिया यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे.’’ मुख्यमंत्री होताच मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये वेगाने उदयाला येत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा सामना करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ‘बाबरी मशिदीवर एक परिंदाही पंख मारू शकणार नाही,’ या वाक्यानं त्यांना मुस्लिमांच्या अगदी जवळ आणलं. एवढंच नाही, तर दोन नोव्हेंबर १९९० रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर आधी लाठीमार करण्यात आला आणि नंतर गोळीबार करण्यात आला. त्यात डझनाहून अधिक कारसेवक मारले गेले. या घटनेनंतर भाजपसमर्थक मुलायमसिंह यादव यांना ‘मौलाना मुलायम’ म्हणू लागले.

मुलायमसिंह यांनी चार ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. भारतीय जनता पक्षाचा वाढता आलेख आपण एकटे रोखू शकणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षासोबत निवडणूक युती केली. त्या वेळी उद्योगपती जयंत मल्होत्रा यांनी कांशीराम यांची भेट घेत ही युती प्रत्यक्षात आणली. १९९३च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला २६० पैकी १०९ जागा मिळाल्या तर बहुजन समाज पक्षाला १६३ पैकी ६७ जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला १७७ जागांवर समाधान मानावं लागलं. मुलायमसिंह यांनी कॉंग्रेस आणि बसपच्या पाठिंब्याने राज्यात दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुलायमसिंह १९९६ पर्यंत जसवंतनगरमधून आमदार होते. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९९३ मध्ये ते दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९९६ मध्ये मुलायमसिंह यादव यांनी मैनपुरीतून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. १९९६ ते १९९८ पर्यंत ते संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते.

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडल्यानंतर मुलायमसिंह यांनी आपण कॉंग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. त्यांच्या आश्‍वासनानंतरच सोनिया गांधी यांना २७२ खासदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं; पण नंतर त्यांनी दिलेल्या शब्दापासून माघार घेतल्याने सोनिया यांची मोठी अडचण झाली. मुलायमसिंह यांच्या इच्छेविरुद्ध अखिलेश यांनी मायावतींसोबत २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. या युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि काही दिवसांमध्येच ही युतीही तुटली. मुलायमसिंह यांना त्यांच्या सर्वस्पर्शी संबंधांमुळे नेताजी ही पदवी देण्यात आली होती. उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणाची नाडी समजून घेणार्‍या नेत्यांमध्ये मुलायम यांची ओळख होती आणि सर्व पक्षांमध्ये ते ओळख राखून होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय राजकारणातल्या एका धूर्त आणि मुत्सद्दी राजकारण्याचा अंत झाला आहे.


पुरुषोत्तम पगारे (लेखक समाजवादी विचाराचे
राजकीय कार्यकर्ते आहेत)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये