‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मुंबई | Kishori Pednekar – निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह आणि नावं देण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं (Shivsena) तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. तर शिंदे गटाचं चिन्ह अजूनही ठरलेलं नसून त्यांनी निवडणूक आयोगाकडे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकरांनी आज (11 ऑक्टोबर) शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
“मशाल निशाणी 1985 ला शिवसेनेला मिळाली होती. त्यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) त्यावर निवडणूक लढले होते. आज 2012 ला बाळासाहेब गेल्यानंतर जी मशाल स्मृतीस्थळावर लावण्यात आली होती ती कायम धगधगते आहे. ते चिन्ह आम्हाला मिळाले आहे. आज वाईट पद्धतीने बाळासाहेबांच्या पक्षाला बुडवण्याचं काम करण्यात आलं आहे. मात्र, जेव्हा नियती उत्तर देते, तेव्हा सर्वच शांत होतात. आज निशाणी जी मिळाली आहे. हा नियतीचाच प्रकार आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पुढे पेडणेकर म्हणाल्या, “आम्हाला निवडणूक आयोगाकडे तीन नावे आणि चिन्हे दिली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला निवडणूक आयोगानं दिलं आहे. हे नाव आणि चिन्ह तात्पुरते असलं तरी शिवसैनिकांच्या मनाला उभारी देण्याचं काम करणारं आहे. शिवसैनिक निखारा आहे, तो कधीही पेटला असता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वानं ते होऊ दिलं नाही. त्यामुळे विरोधकांचे राष्ट्रापती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जे काम प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत.”