“लाॅकडाऊन आवडतो म्हणून…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | CM Eknath Shinde On Uddhav Thackeray – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांना लाॅकडाऊन आवडतो. चीनमध्ये लाॅकडाऊन झाला की लगेच लाॅकडाऊन घोषित करायचे. त्यामुळे दोन वर्ष कुठलेही सण सोहळे साजरे झाले नाहीत. आता आम्ही सर्व सण कसे दणक्यात साजरे करतो, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ते मीरा रोड येथे लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामध्ये लता मंगेशकर नाट्यगृह, महाराणा प्रताप आणि चिमाजी अप्पा स्मारकांचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत. म्हणून आम्हाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आरपारची पहिली लढाई आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. तसंच आम्हाला सत्तेचा मोह नव्हता. त्यामुळे मंत्री असतानाही सत्ता सोडली असंही शिंदे म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं आहे.