पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

निम्‍म्‍याहून अधिक सेवा ऑनलाइन

कर संकलन : हस्तांतरण सुविधा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर संकलन विभागाच्‍या सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्याच्‍या दृष्टीने जोरदार प्रयत्‍न सुरू आहेत. कर संकलन विभागाच्या 12 सेवांपैकी 7 सेवा या पूर्वीच ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 5 सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा 100 टक्के ऑनलाइन सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. तसेच उर्वरीत 4 सेवा या 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मंगळवार (दि.11) रोजी 40 वा वर्धापन दिन होता. यानिमित्त कर आकारणी व कर संकलन विभागाच्या विविध सेवांचे लोकार्पण आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ताधारकांना जलद गतीने सेवा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. पालिकेने ऑनलाइन सेवेच्या समारंभाबरोबरच नियमित व प्रामाणिक कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखल्यासाठी पूर्वी दहा रुपये शुल्क घेण्यात येत होते. हा दाखला नि:शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींचे मालमत्तांना 30 जूनपूर्वी देय सवलतीचा लाभ वर्षभर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्ता कर सवलत योजनापासून वंचित राहत होते. त्यांना देखील सवलत योजना लागू केली आहे. याशिवाय नागरिकांना एकात्मिक व परस्पर बिल पेमेंट सेवा देण्याच्या उद्देशाने बीबीपीएस (भारत बील पेमेंट सिस्टीम) व्दारे पैसे भरण्याची सुविधा सुरु करण्यात येत असल्याचेही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तांना 30 जूनपूर्वी सामान्य कर सवलतीचा लाभ देण्यात येत होता. चालू आर्थिक वर्षात नव्याने आकारणी व नोंदणी होणाऱ्या मालमत्ता सामान्य करातील सवलत योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते.

16 विभागीय कार्यालयांमध्ये सुविधा

मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन आणि 16 विभागीय कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा ॲपचा वाढता वापर लक्षात घेऊन महापालिकेने आता कर भरण्यासाठी या तिन्ही ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना कुठेही आणि कधीही कर भरता येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये