नागरिक सुविधांसाठी ‘वेब चॅटबॉट’ सेवा उपयुक्त ठरेल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने “व्हॉट्सअॅप” आणि “वेब चॅटबॉट” प्रणालीचा वापर करून नागरिकांच्या विविध सेवासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असून, चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. चॅटबॉट सुविधा नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. महापालिकेच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे नागरी सुविधांसाठी “वॉट्स अॅप” आणि “वेब चॅटबॉट” सेवेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उपायुक्त विठठल जोशी, उपायुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर, वामन नेमाणे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, उज्ज्वला गोडसे, दीपक पवार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे, प्रकल्प संचालक अविनाश पाटील, प्रकल्प व्यवस्थापक अमोल वानखेडे, प्रशांत परसाई यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्या पुढाकाराने “चॅटबॉट” व “व्हॉटसॲप चॅट” प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या वतीने इंटीग्रेटेड जीआयएस एनॅबल्ड ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जीआयएस, एसएपी एस फोर एचएएनएन आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटचे सदर प्रणालीमध्ये इंटीग्रेशन करण्यात येत आहे. “चॅटबॉट” या प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे.