शेलारमामा जीवनदर्शन प्रदर्शन! “मामांचे चरित्र मानव जातीचे कल्याण करणारे” राहुल कराड

पुणे : सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात शेलारमामांनी केलेल्या अमूल्य योगदानाचे महत्व, योगासनात केलेले प्रयोग व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा सर्व स्तरातील नागरिकांना होणे गरजेचे आहे. त्यांचे जीवनचरित्र सर्व मानव जातीचे कल्याण करतील. यासाठी ही प्रदर्शनी महत्वाची आहे, असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले.
थोर स्वातंत्र्यसेनानी ह.भ.प. संत श्री. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या १६व्या पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्य सेनानी ह.भ.प. संत श्री. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा योग संशोधन सेवा प्रतिष्ठान, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहतर्फे कोथरूड येथील विद्यापीठाच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात शेलारमामा यांची जीवनदर्शन प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दोन दिवसीय ही प्रदर्शनी १३ ऑक्टोबरपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी निःशुल्क ठेवण्यात आली आहे. या वेळी पं. वसंतराव गाडगीळ, शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. टी.एन. मोरे, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा, डॉ. मिलिंद पात्रे आणि निरंजन खैरे उपस्थित होते.
या प्रदर्शनात शेलारमामांनी स्वातंत्र्य संग्रमात सहभागी झाल्या संदर्भातील फोटो, चिलखत, गुप्ती, विविध संस्थाकडील पुरस्कार, गौरव चिन्ह, गोवा मुक्ती संग्राममध्ये सहभागी झाल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या ताम्रपट, भीष्माचार्य व चिंतामणी पुरस्कार, शाहु आंबेडकर पुरस्कार, अमरावती विद्यापीठाद्वारे देण्यात आलेले पुरस्कार असे ४२ पुरस्कार ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, पुस्तके, जीवन चरित्र, त्यांच्या संदर्भात वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले कात्रणे व लेख सुद्धा येथे पहावयास मिळणार आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे ते गुरू होते. शेलार मामांचे कार्य तरूण पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.