“माझा भाऊ काॅप्या करून…”, सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
मुंबई | Sushma Andhare On CM Eknath Shinde – उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) हल्लाबोल केला. सुषमा अंधारे काल (13 ऑक्टोबर) नवी मुंबईमधील महाप्रबोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरून चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेला. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात. बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ काॅप्या करून पास झालाय का?”, असा मिश्कील प्रश्न अंधारे यांनी विचारला.
“हुशार आहे माझा भाऊ. विद्वान आहे माझा भाऊ. का कागद देताय तुम्ही त्यांना? का काॅप्या पुरवताय?”, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. तसंच “गिरीश महाजनांनी कागद धरून सांगायचं. हे अजिबात बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे आम्हाला पटलेलं नाही”, अशी खोचक टीका अंधारे यांनी केली आहे.