“शरद पवार ज्याला हात लावतात, त्याची राख होते”

बारामती | Gopichand Padalkar On Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. शरद पवार ज्या गोष्टीला हात लावतात, त्याची राख होते, अशी टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवारांनी हात लावल्यानेच शिवसेनेची राख झाली, असंही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शिवसेना फुटली असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी गोपीचंद पडळकरांना विचारला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले, “हे पाहा मी एक गोष्ट ऐकली होती. आटपाट नगरात एक राजा होता. त्यानं कोणत्याही गोष्टीला स्पर्श केला तर त्याचं सोनं होत होतं, असं आम्ही ऐकलं होतं, तुम्हीही सगळ्यांनी ऐकलं असेल. पण बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात एखाद्या गोष्टीला लागला तर त्याची राख होते. हे आपण शिवसेनेच्या बाबतीत प्रत्यक्ष बघितलं आहे”.
“त्यामुळे जो-जो राष्ट्रवादीच्या नादाला लागला त्याची राख होते. आता शिवसेनेचीही झाली आहे, हे मी स्वत: म्हणत नाही. हे शरद पवारांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. भाजपा आणि शिवसेना पक्षांत अंतर यायला हवं, म्हणून मी बरेच प्रयत्न केलेत, असं शरद पवार स्वत: म्हणाले आहे. हे पवारांचं वाक्य आहे. त्यांना शिवसेनेला कसल्याही पद्धतीत संपवायचं होतं. त्यांचं काम आता पूर्ण झालं आहे” अशी टीका पडळकरांनी केली आहे.