“सुशांत, दिशा अन् हिरेन यांच्याबाबत…”, नितेश राणेंचं सूचक ट्विट
मुंबई | Nitesh Rane – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात गौरी भिडे (Gauri Bhide) यांनी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता गौरी भिडे यांना संरक्षण देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी सूचक ट्विट केलं आहे.
नितेश राणेंनी या ट्विटमध्ये सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput), दिशा सालियन (Disha Salain) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) या तीन दिवंगत व्यक्तींच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“गौरी भिडे यांच्या जीवाचं रक्षण होणं महत्त्वाचं असून त्यांना महाराष्ट्र शासनानं संरक्षण देण्याची गरज आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्याबाबत काय झालं ते आम्हाला माहिती आहे”, असं सूचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची बुधवारी न्यायमूर्ती एस गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे.