ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर युतीची चर्चा; पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Ajit Pawar – काल (21 ऑक्टोबर) मनसेच्या वतीनं दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. तसंच गेल्या काही दिवसांपासून मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यानं युतीच्या चर्चांना जास्तच उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बारामतीत असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या भेटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच या तिन्ही पक्षाचे नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी करत आहेत. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तिन्ही पक्षांकडून याबाबत जाहीर टिप्पणी करणं टाळलं जात असलं, तरी युतीबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असं उत्तर येत आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झालेल्या अजित पवारांनी मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. “त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.