शिवसेनेशी गद्दारी केली, बळीराजाशी गद्दारी नको, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल…

औरंगाबाद : (Uddhav Thackeray On State Government) शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांतील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. तर शेताच्या बांधावरच पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केलीय, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. हे सरकार भावना नसलेलं सरकार आहे, उत्सवी सरकार आहे, उत्सव साजरे करताना राज्यातील प्रजा दु:खात आहे हे देखील ते पाहत नाही, असं ते म्हणाले आहेत.
शेतकरी म्हणून एक व्हा, शेतकऱ्यांनी आसूड वापरायला हवा, आसूड तुमच्या हातामध्येच शोभून दिसतो. शेतकऱ्यांनी आसूडाच्या माध्यमातून सरकारला घाम फोडला पाहिजे. यामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली मात्र बळीराजाशी गद्दारी करु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.