खोक्यांसाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

जळगाव : (Eknath Khadase On Shinde-Fadnavis Government) चार महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह पक्षविरोधात बंडखोरी करत, राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. त्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्तापरिवर्तन करुन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्या खाली घेतली. तेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याचे काम करत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या असंख्य निर्णयाला शिंदेंनी स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. आज आणखी एक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून मविआमधील काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच बंडखोर आमदारांचीही सुरक्षा कायम ठेवली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला आहे. 50 खोके सुरक्षित ठेवण्यासाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? ज्यांनी 50 खोके घेतले, त्या खोकेवाल्यांची सुरक्षा का नाही काढली? असा सवाल एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला आहे. महाविकास आघाडीच्या 40 नेत्यांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे. हा राजकीय सुडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.