रवी राणांच्या दिलगिरीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय…”

मुंबई | Bacchu Kadu – गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद सुरू होता. या वादावर आता रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर रवी राणा यांनी चर्चा केली. त्यानंतर राणांनी आपले शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर मी माझे शब्द परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. परंतु, बच्चू कडू यांनी देखील आपले अपशब्द मागे घ्यावेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आता बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, “या सगळ्यावर कार्यकर्त्यांच्या भूमिका फार महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी कार्यकर्ता आणि जनता फार महत्त्वाची आहे. आज (31 ऑक्टोबर) संध्याकाळी आम्ही बैठक घेणार आहोत. या बैठकीनंतर कशा पद्धतीनं सामोरं जायचं?, काय करायचं? उद्या आमचा दुपारी 12 वाजता जाहीर मेळावा आहे. जिथे आम्ही पुरावा मागण्यासाठी बसणार होतो. उद्या (1 नोव्हेंबर) राज्यभरातील सर्व कार्यकर्ते येणार आहेत. तिथे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.”
“या सगळ्याबद्दल खरंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचेही आभार आहेत. परंतु कार्यकर्त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझा आत्माच कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाही. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” असंही बच्चू कडू म्हणाले.