भरतीचा मार्ग झाला मोकळा

शासनाच्या २९ विभागातील ७५ हजारांची पदभरती होणार
मुंबई : राज्य सरकारच्या २९ विभागांतील ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने काही नियम बाजूला ठेवून यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सुधारित रचना अंतिम झालेल्या विभागातील थेट सेवा कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ज्या विभागांची सुधारित रूपरेषा अद्याप निश्चित झालेली नाही अशा विभागांमधील गट-अ आणि गट-ब तसेच गट-ब वाहनचालक आणि गट-ब संवर्गातील पदे वगळून थेट सेवा कोट्यातील ८० टक्क्यांपर्यंत रिक्त पदांना परवानगी दिली आहे.
६२३ पदे भरली जाणार…
दरम्यान, सरकारने मंजूर स्वरूप बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा पवित्रा घेतला आहे. ही शिथिलता पुढील वर्षभरासाठी लागू असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२ अंतर्गत ६२३ पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर ६२३ पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. ११ मे रोजी राज्यसेवा परीक्षा २०२२ साठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सध्याच्या परीक्षेसाठी काही नवीन संवर्गातील ४३२ पदांसाठी अतिरिक्त मागणी पत्रे शासनाकडून प्राप्त झाली आहेत. राज्य नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी १६१ पदे तसेच अतिरिक्त ४६२ पदे विचारात घेऊन परीक्षेतून विविध संवर्गातील ६२३ पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे मागील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. त्यामुळे देशातील अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विविध विभागातील कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मात्र, यापूर्वी कर्मचाऱ्यांची भरती करताना अनेक वादग्रस्त निर्णय झाल्याचे दिसून आले आहे. आता राज्य सरकार ही नोकरभरती पारदर्शक पद्धतीने कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही पदे भरली जाणार…
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशा प्रकारची गट अ आणि गट ब संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा १ एप्रिल २०२३ रोजी गणण्यात येईल तर इतर सर्व पदांकरिता वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद १ सप्टेंबर २०२२ गणण्यात येईल. आधी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा २०२२ ही १६१ पदांसाठी घेण्यात येणार होती. आता यामध्ये ४३२ पदे वाढवली आहेत. त्यामळे आता एकूण ६२३ पदांची भरती या परीक्षेतून होणार आहे. डिसेंबरमध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ डिसेंबरमध्ये होणार आहे.