किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’बाहेर तुफान गर्दी, ‘ती’ खास पोज देत शाहरूखनं…

मुंबई | Shah Rukh Khan Birthday – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा (Shah rukh Khan) आज (2 ऑक्टोबर) 57वा वाढदिवस आहे. शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ (Mannat) बंगल्यासमोर त्याच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. तसंच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर विविध प्रकारे शुभेच्छांचा वर्षाव केला.
काल रात्री शाहरूखसाठी त्याच्या चाहत्यांनी फुलं, भेटवस्तू आणल्या होत्या. तर काही चाहत्यांनी फटाके फोडले तर काहीजण शाहरूखचे पोस्टर घेऊन आले होते. यावेळी शाहरुख खान स्वतः घराच्या गेटवर येत सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसला. तेव्हा त्याचा लहान मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी शाहरुखनं त्याची सिग्नेचर पोज देत चाहत्यांचं प्रेम स्वीकारलं.
दरम्यान, शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. तो अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जाॅन अब्राहमसोबत या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसंच शाहरूख अभिनेत्री तापसीसोबत ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे.