“40 आमदारांना गाडण्यासाठी…”, शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
मुंबई | Arvind Sawant On Shinde Group – एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फूट पडली आहे. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. यादरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अन्य विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी शिवसेनेनं शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. 40 आमदारांना गाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोक वाट पाहत आहेत. निवडणूक लागली की लोक त्यांना घरी बसवतील, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
माहिती अधिकाराअंतर्गत ‘वेदांता फाॅक्सकाॅन’ प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात अरविंद सावंत म्हणाले, “संतोष गावडे नावाच्या मुलानं 31 ऑक्टोंबरला पत्र लिहीलं आणि तेव्हाच त्याला उत्तरही आलं. एमआयडीसीकडे उत्तर तयार होताच फक्त कोणाच्या तरी पत्राची वाट पाहत होते”, असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, “प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात गेला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका का घेतल्या. याप्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारची चिरफाड केली आहे. तसंच समोरासमोर येऊन चर्चा करा, असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे”, असंही अरविंद सावंत म्हणाले.