“हे चाळीस गद्दार लग्नातही गेले तरी…;” अकोल्यात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

अकोला : (Aaditya Thackeray On Eknath Shinde Group) शिवसैनिक म्हणून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, इमान विकलं नाही अशा व्यक्तीला मिठी मारायला अकोल्यात आलो असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार नितीन पाटील यांच्यावर म्हटलं आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभं राहण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केली आहे. त्या गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार असल्याचा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुढे म्हणाले, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार असून तुम्ही सज्ज रहा. लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. शिवसेनेची खरी ताकद हे सच्चे शिवसैनिक आहेत. हे सच्चे लढवय्ये माझ्या पिढीसाठी आदर्श आहे. जनतेमुळे मोठे झालेले 40 गद्दार महाराष्ट्रातून पळून गेले आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात करुन हे सरकार स्थापन केले. हे सरकार कोसळणारच असल्याचा दावाही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हे बंडखोर चाळीस गद्दार लग्नातही गेले तरी लोकं त्यांना पन्नास खोके, एकदम ओक्के म्हणून चिडवतात. त्यामुळे हे गद्दार आता कुठं तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नसल्याचीही सडकून टीकाही यावेळी त्यांनी केली. मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, महिलांच्या सन्मानासाठी, तरुणांच्या प्रश्नांसाठी तुमच्या सोबत उभा असल्याचेही यावेळी ते म्हणाले. तसेच त्यांनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. चाळीस गद्दारांनीही राजीनामा द्यावा आणि राज्यातील जनतेला ठरवू द्या ते कोणाच्या पाठीशी उभे आहे असे आव्हानही दिलं आहे.