‘खोके घेऊन बोके इतके माजलेत की…’, सत्तारांच्या विधानावर केदार दिघेंची तिखट प्रतिक्रिया
मुंबई : (Kedar Dighe On Abdul Sattar) शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहीली आहे, त्यांनी म्हटले की, “मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत.”
सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.
त्यानंतर माध्यमांनी अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तार सत्तार म्हणाले, “ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?”