सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जर कोणी चुकीचे बोलले असेल…”
मुंबई – SUPRIYA SULE ON ABDUL SATTAR : काल (७ नोव्हेंबर) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने करत निषेध केला. त्याचबरोबर अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांकडून केली जात आहे. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्यपालांना देखील पत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, काल सत्तारांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मला यावर “काहीही बोलायचं नाहीये” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. मात्र, आज त्यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्यात, की “राज्यातील एका मंत्र्याकडून वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.”
“मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.