शिंदे गटातील आमदार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, माध्यमांसमोर केली शिवीगाळ
मुंबई | Sanjay Gaikwad – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. सध्या शिंदे गटामध्ये काय सुरु आहे, कुणाचं बिनसलं आहे याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. आता गद्दारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या पिढ्यांना देखील ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. यावर शिंदे गटातील (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पलटवार केला आहे. त्यांनी राऊतांवर टीका करताना थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आहे.
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नाही तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘मा****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं तर जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. लोकांनी शिवसेना-भाजप म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू” असं गायकवाड म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर हल्लाबोल केला. “जसं चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल”, असं राऊत म्हणाले होते.
One Comment