“डाॅक्टर चांगली औषधं देतो की…”, आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई | Ashish Shelar On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटलं आहे. यावरून आता संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. यामध्ये भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
“संजय राऊत यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित दोन पुस्तकं पाठवली आहेत. त्यांनी याचा अभ्यास करावा,” असा टोला आशिष शेलारांनी लगावला. बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहे. शेतकऱ्याला एखादं संकट आल्यावर ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे,” अशी टीकाही शेलारांनी केली.
पुढे ते म्हणाले, “गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर तालिबानच्या भागात हल्ला झाल्याचं आम्ही पाहिलं होतं. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असणारा समाज आणि त्यातही आमचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण केला जात आहे. हे का केलं जात आहे? हा आमचा प्रश्न आहे”, असं शेलार म्हणाले.
संजय राऊतांनी आपलं अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडलेली नाही. डॉक्टर चांगली औषधं देतो की कंपाऊंडर या वादात मला पडायचं नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणं अक्षम्य चूक आहे, असंही आशिष शेलारांनी म्हटलं आहे.