नामांतरचा वाद पेटला! अहिल्यादेवींच्या नावाला विरोध केल्याने, सुजय विखेंच्या विरोधात जिल्हाभर आंदोलने

अहमदनगर : (Sujay Vikhe On Gopichand Padalkar) अहमदनगर शहराच्या नामांतर मुद्द्याने सध्या वेगळंच वळण घेतलं आहे. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. यासाठी धनगर समाज एकवटला असून ठिकठिकाणी विखे यांचा निषेध करण्यात येत आहे.
धनगर समाजाच्या रोष अंगावर ओढावून घेतल्यानंतर आणि आपली चूक लक्षात आल्यास प्रसारमाध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, यासंबंधी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरवला जात आहे. अहमदनगरला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यावर मला माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता आपण सांगितलं की, नामांतराचा विषय स्थानिक पातळीवर ठरवला जाईल. येथील लोकप्रतिनिधी, नागरिक, विविध संस्था यांची मते विचारात घेऊन स्थानिक पातळीवरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. बाहेरच्या लोकांनी हे परस्पर ठरवून नये, असे माझे मत असून त्यावर आजही ठाम आहे.
‘अहमदनगरमधील जनता जोपर्यंत याबाबत मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे मला संयुक्तिक वाटत नाही. अहमदनगरची परंपरा वेगळी आहे. येथे समाजकारण आणि राजकारण अशी जोड देऊन काम केलेले अनेक नेते होऊन गेले. अहमदनगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा आहे. राज्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. सामाजिक सलोखा अनेक वर्षे या जिल्ह्याने टिकवून ठेवला आहे. अशा परिस्थितीत कारण नसताना काही लोक यात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी ते बंद करावे, अशी माझी विनंती आहे,’ असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचेच विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता.