“…नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार… पवार’ असं ओरडत फिरायची वेळ येईल”, मनसे नेत्याचा राऊतांना सल्ला
मुंबई | Sandeep Deshpande – मागील दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिंदे गटावर (Shinde Group) गंभीर आरोप करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यापार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संजय राऊतांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी राऊतांना सल्ला देखील दिला आहे.
संदीप देशपांडेंनी पत्रात म्हटलं आहे की, “आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र! हे येडंxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.”
“माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या 10 ते 15 मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल”, असा सल्ला संदीप देशपांडेंनी राऊतांना दिली.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या (Sharad Pawar) नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना (Shivsena) हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर चु%^* आहे असं म्हणून विसरून जा”, असंही देशपांडे म्हणाले.