“विद्यार्थ्यांसमोरच मुख्यमंत्र्यांना केला फोन अन्…”, पुण्यात शरद पवारांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट

पुणे | Sharad Pawar – सध्या पुण्यात (Pune) एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले असून ते आंदोलन (MPSC Student Protest) करत आहेत. हे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसांत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे.
शरद पवार आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊ. या बैठकीला मी देखील उपस्थित राहीन. आंदोलनस्थळी येताना आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. त्यानंतर यावर येत्या दोन दिवसांत चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, अशी माहिती शरद पवारांनी विद्यार्थ्यांना दिली. तसंच मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या संबंधित बैठकीला कोण-कोण हजर राहणार? अशा पाच विद्यार्थ्यांची नावं आपल्याला कळवावीत. मी या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन या बैठकीला जाईल, असं आश्वासनही शरद पवारांनी यावेळी दिलं.
तसंच शरद पवारांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्र्यांना फोन लावला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केलं आहे. मात्र हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत नोटीफिकेशन निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत.
One Comment