कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; म्हणाले, “लवकरच…”
कोल्हापूर | Nagraj Manjule – मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. नागराज मंजुळेंच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. त्यामुळे ते पुढे आणखी कोणता नवीन चित्रपट घेऊन येणार याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच आता नागराज मंजुळेंनी कोल्हापुरातील (Kolhapur) कुस्तीच्या मैदानातून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना त्यांच्या या नवीन चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
देशाला कुस्तीमध्ये पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेले खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Movie) यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय नागराज मंजुळेंनी घेतला आहे. त्यांनी कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात हजेरी लावली होती. यावेळी मंजुळेंनी कुस्तीच्या मैदानातून खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याची मोठी घोषणा केली.
यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक दर्जाचे आणि किर्तीचे पैलवान होते. म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यासंदर्भात लवकरच मी माहिती देईल. या चित्रपटाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे”.