ताज्या बातम्या

“आता स्त्रियांनी…”; जागतिक महिला दिनी मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर

मुंबई | आज 8 मार्च म्हणजेच महिला दिन (Womens Day) जगभरात विविध प्रकारे साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या दिवशी महिला हक्क, महिला सबलीकरण, महिलांचा विकास, महिलांची प्रगती अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असतात. त्यानंतर आता समाजाच्या ज्या ज्या क्षेत्रात महिलांचा वावर कमी आहे, अशा क्षेत्रांतही महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या महिला दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला आवाहन केलं आहे. मनसे महिलांना संधी देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये ?

आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

100, 150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

image 1 4

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये