पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून…” राहुल गांधींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : (Rahul Gandhi On Narendra Modi) शुक्रवार दि. 24 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळं देशात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे. त्यातच आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत आहेत. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? हे विचारणं मी सोडणार नाही. पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली. मला कोणाही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी घाबरणार नाही. मी संसदेत प्रश्न विचारले, माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. या देशानं मला सर्वकाही दिलं आहे. देशानं मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मी संसदेत मोदी आणि अदानींच्या नात्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यांचं नातं हे खूप जून आहे. त्यानंतर माईक ऑफ करुन, माझं भाषण बंद करण्यात आलं. त्यानंतर मी लोकसभा अध्यक्षांना यासंदर्भातील डिटेल रिपोर्ट पाठवला, पण लोकसभा अध्यक्षांनी या पत्राला उत्तर दिलं नाही.
त्याचबरोबर मंत्री माझ्याबाबत संसदेत खोटं बोलले. त्यांनी सभागृहात सांगितलं की मी परदेशात खोटं बोललो. त्यावर मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं पण त्या पत्राचंही उत्तर आलं नाही. त्यानंतर यासंदर्भात मी आणखी एक पत्र लिहिलं पण त्याचंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेलो आणि मला नियमानुसार बोलू दिलं जात नसल्याचं सांगितलं. यावर अध्यक्षांनी हसत म्हणाले मी काहीही करु शकत नाही. त्यानंतर काय घडलंय हे आपण सर्वच जाणता आहात”, असं राहुल गांधी म्हणाले.