यशस्वी-बटलरचं वादळ, हेटमायरची फिनिशिंग, राजस्थानचे दिल्लीपुढे 200 धावांचे आव्हान

गुवाहाटी : (IPL 2023, RR vs DC) यशस्वी जायस्वालची दमदार सुरुवात, जोस बटलरची संयमी फलंदाजी आणि शिमरोन हेटमायरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयलने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 200 धावांचे आव्हान मिळाले आहे.
राजस्थानचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने आज आक्रमक सुरुवात केली. जायस्वाल याने 31 चेंडूत 60 धावांची खेळी केली. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला दमदार सलामी दिली. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल फटकेबाजी करत असताना जोस बटलर संयमी फंलदाजी करत साथ देत होता. बटलर आणि यशस्वी यांनी 8.3 षटकात 98 धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया या जोडीने रचला.
जायस्वाल चौकार षटकार मारत असताना बटलर दुसऱ्या टोकाला शांतपणे फलंदाजी करत होता. जोस बटलर याने अखेरच्या काही षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने शिमरोन हेटमायर याला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवली. जोस बटलर याने 51 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटकार लगावला.
राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. पहिल्या षटकापासूनच चौकारांचा पाऊस पाडला. सुरुवातीला यशस्वी जायस्वाल याने फटकेबाजी केली. त्यानंतर मधल्या षटकात जोस बटलर याने आपले काम चोख बजावले आणि अखेरच्या षटकात हेटमायरने फिनिशिंग टच दिला.