सावधान! 12 वर्षांखालील मुलांवर कोरोनाचा अटॅक; तुमच्या मुलांना गर्दीत जाण्यापासून वेळीच रोखा

मुंबई | देशातील विविध शहरांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, दिल्लीत 12 वर्षांखालील मुलांना व्हायरसची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत. त्यामुळं आता लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं बनलं आहे. डॉक्टरांनी लठ्ठपणा, दमा आणि इतर रोगप्रतिकारक स्थितींनी ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांना लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला आहे. त्यामुळं आता या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांची काय काळजी घेण्याची गरज आहे.

रुग्णालयांमधील चाइल्ड ओपीडीमध्ये कोविड सारखी लक्षणे असलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोना प्रमाणेच असलेल्या एडेनो व्हायरस असलेल्या दोन वर्षांखालील मुलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

डॉक्टरांच्या मते, एडेनो व्हायरस आणि कोरोना व्हायरसमध्ये खुप सूक्ष्म फरक आहे. डॉक्टराचे म्हणणे आहे की सामान्य सर्दी/ ताप / एडेनो व्हायरस आणि कोविड-19 मधील फरक चाचण्याशिवाय कळणे कठीण आहे.

कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय हा मास्क घालणं आणि सार्वजनिक ठिकाणी फिरणं टाळणं हा आहे. त्यामुळं तुमच्या घरात लहान बाळ किंवा मुलं असतील त्यांना सातत्यानं मास्क लावायला हवा. त्याचबरोब त्यांना सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाणं टाळायला हवं. याशिवाय त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे पदार्थ खाऊ घातले पाहिजे.