“येत्या 15 दिवसात एक नाही तर दोन राजकीय भूकंप होणार…”, सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Supriya Sule – महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचं म्हटलं जातंय. काल (17 एप्रिल) अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्याच्या राजकारणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सुप्रिया सुळेंना माध्यमांनी अजित पवार कुठे आहेत? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुम्ही त्यांच्या मागे जा, मग तुम्हाला समजेल ते कुठे गेले आहेत. अनेक समस्या असतात, राज्यात कामं होत नाहीत त्यामुळे अजित पवार काही कार्यक्रम रद्द करून गेले आहेत. एक कार्यक्रम रद्द केल्यामुळे काही होत नाही.
अजित पवार भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, माझ्याकडे गाॅसिपींगसाठी वेळ नाही. माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप कामं आहेत. मला याबाबत काहीही माहिती नाही. अजितदादा मेहनत करणारा माणूस आहे त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा होत आहेत.
तसंच काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी पंधरा दिवसात राज्यात राजकीय भूकंप होईल असं म्हटलं होतं. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक नाही तर दोन राजकीय भूकंप होणार आहे. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.