ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उष्माघात मृत्यु प्रकरणावरून संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; म्हणाले, “आता तुमची माणुसकी…”

मुंबई | Sanjay Raut On Devendra Fadnavis – रविवारी (16 एप्रिल) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम खारघरमध्ये भर दुपारी आयोजित करण्यात आला होता. दुपारी रखरखत्या उन्हात हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक राज्य सरकारवर आक्रमक झाले असून या मृत्यूप्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “खारघर येथे श्री सेवकांचा पाणी न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांचा आकडा 50च्या वर गेला आहे. पण सरकार हा आकडा लपवत आहे. सरकारनं पाणी मागणाऱ्या या श्री सेवकांचे बळी घेतले आहेत.”

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खारघरमधील घटनेवर बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये एका जमावानं तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देखील डहाणूमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष ठाण मांडून बसले होते. यावरून त्यांनी देशात राजकारण केलं. पण आता ज्या श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. साधूंच्या हत्येनंतर ज्या लोकांनी छाती पिटली तेच लोक आज खारघरमधील 50 जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. आता फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये