जाणून घ्या ‘किसी का भाई किसी की जान’ची थोडक्यात स्टोरी!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमान खानचा (Salman Khan) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आज रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानचा हा चित्रपट ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची फार चर्चा होत होती. चित्रपट रिलीज होताच सलमानच्या चाहत्यांनी सगळीकडे जल्लोष सुरू केला. ट्विटरवर तर सकाळपासून चित्रपटाचे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. लोक थिएटरमधूनच सिनेमाचे अपडेट देत आहेत.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात सलमान खान एका सेल्फ डिफेन्स ट्रेनरच्या भूमिकेत दिसत आहे. भावांच्या सुखासाठी भांडणारा, त्यांच्या आनंदात स्वत:चा आनंद मानणारा असा हा ‘भाईजान’ आहे. वाद मिटवण्यासाठी तो अनेकदा हिसेंचादेखील वापर करतो. भाईजान लग्नाच्या विरोधात आहे. मुलगी आयुष्यात आल्याने तो त्याच्या भावांपासून दूर जाऊ शकतो असं त्याला कायम वाटत असतं. दरम्यान कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचतं. सलमानआधी त्याचे भाऊच प्रेमात पडतात. नंतर ते त्यांच्या लाडक्या भावासाठी मुलगी शोधू लागतात. दरम्यान भाईजानच्या आयुष्यात भाग्यलक्ष्मीची एन्ट्री होते. दाक्षिणात्य भाग्यलक्ष्मीसाठी भाईजान स्वत:मध्ये अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो. अशातच ‘राऊडी अण्णा’मुळे भाग्यलक्ष्मीचे कुटुंबीय अडचणीत आल्याचं त्याला कळतं आणि भाईजान त्यांच्या मदतीला धावतो.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या माध्यमातून सलमान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असून या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सलमान याही सिनेमात अॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा एकंदरीतच मनोरंजनात्मक आहे.