मास्टर ब्लास्टरच्या वाढदिवसानिमित्त सेहवागने दिल्या शीर्षासन करत हटके शुभेच्छा

Sachin Tendulkar Birthday : भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा त्याचा 50वा वाढदिवस आहे. भारतातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांकडून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयुष्याचं अर्धशतकं पूर्ण केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य धावा करणाऱ्या या महान फलंदाजाची उंची जरी कमी असली तरी त्याचे काम एव्हरेस्टपेक्षाही मोठे होते. जगभरातील सर्व मोठ्या संघांविरुद्ध सचिनने शतके झळकावून चाहत्यांची मने जिंकली आहेत. निवृत्तीनंतरही सचिनचे फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सचिनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्यान ट्विटरवर शेअर केला आहे.
वीरेंद्र सेहवागने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो शीर्षासनामध्ये सचिन तेंडुलकरला शुभेच्छा देताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने म्हटलं आहे की, ”मैदानावर तुम्ही जे सांगितलं, नेहमी त्याच्या उलटच केलं आहे. त्यामुळे आज तुमच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उलटा होऊन शीर्षासन करत तुम्हांला शुभेच्छा देत आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… पाजी, आप जिओ हजारों साल, साल के दिन हो एक कोटी.”