शिव ठाकरेनं 2 मोठ्या मराठी चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या, स्वत:च सांगितलं कारण; म्हणाला, “माझं मन…”

मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) नंतर शिव ठाकरे (Shiv Thakare) चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत लाखोंच्या संख्येनं वाढ झाली आहे. बिग बाॅसनंतर शिव ठाकरे आता ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या शोच्या आगामी पर्वामध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशातच शिवनं दोन मोठ्या मराठी चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. याबाबत त्याने स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
नुकतीच शिवनं ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, “मला दोन मराठी चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली होती. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन मराठीतील दोन नावाजलेले दिग्दर्शक करणार आहेत. पण या चित्रपटांचं शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार होतं. तसंच मी अगोदरच ‘खतरों के खिलाडी’ या शोला होकार दिला होता. त्यामुळे माझ्या तारखा या चित्रपटांच्या शेड्युलशी जुळत नव्हत्या. त्याचबरोबर माझं मनही ‘खतरों के खिलाडी’मध्येच गुंतलं होतं. त्यामुळे मी त्या दोन चित्रपटांना नकार दिला.”
“जर मी कॅमेऱ्यासमोर उत्स्फूर्तपणे अभिनय करू शकलो तरच मी प्रेक्षकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. त्यामुळे सध्या मी माझी बोलण्याची पद्धत आणि इतर काही गोष्टींवर काम करत आहे”, असंही शिवनं सांगितलं.
दरम्यान, लवकरच शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी होणार आहे. तसंच शिव या शोसाठी जय्यत तयारी करतानाही दिसत आहे. त्यामुळे शिवला या शोमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.