पोलिसांचा धाक संपलाय? भरदिवसा वराह पालक यांच्याकडून तक्रारदार तरुणांना बेदम मारहाण..
बीड – (Beed Crime News) जिल्ह्यातील माजलगाव लगत असलेल्या खरात आडगाव येथे गावातील काही लोक मोकाट वराह (डूकर) पालन करतात. त्याचा गावाशेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. मागील अनेक वर्षे या मोकाट शेळ्या आणि डूकरांचा गावकऱ्यांना त्रास होत होता. मात्र सर्व गावकरी मुग गिळून गप्प होते. मात्र, काही तरुणांनी या विरोधात आवाज उठवला. मोकाट सोडलेल्या डुकारांची तक्रार पंचायत समिती आणि तहशिलदार यांच्याकडे केली?
गावात मोकाट सोडलेल्या डुकरांची तक्रार पंचायत आणि तहशिलदार यांच्याकडे का केली? हाच राग मनात धरून जे कोणी तक्रारदार आहेत यांना, वराह पालक व्यक्तींकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. भरदिवसा झालेल्या या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यात पोलिसांचा काही धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर अनेकवेळा विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या भोंगळ कारभारामुळे फडणवीसांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे हे सिद्ध झालं आहे.
मोकाट वराह पालक यांच्याकडून हातात लाठ्या, काठ्या, दावे, पाईपाने तक्रारदार तरुणांना घरात घुसून अमानुष मारहाण करण्यात आलीय. यावेळी तक्रारदार आपला जीव वाचवण्यासाठी घराचं गेट लावण्याचा प्रयत्न करत असताना, मोठ्या-मोठ्या दांड्यांनी त्या गेटवर मारत, गेट उघडून तक्रारदारास अमानुष मारहाण करण्यात आली आहे. तर यावेळी घराच्या प्रांगणात 3-4 तरुणांना खाली पाडून वरून दांड्याने मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचे चित्र पाहून आपल्या देखील अंगावर शहारे येतील, आणि क्रुरतेचा कळस काय असतो हे आपल्या लक्षात येईल. या मारहाणीत ज्ञानेश्वर आढाव, कृष्णा शेजुळ, अनंत आढाव, सुखदेव आढाव, हरिभाऊ शेजुळ, गोपाळ शेजूळ यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत