ताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री गायत्री जाधव झाली माऊलींच्या नामात दंग…

फलटण | वारीचे वारे सध्या महाराष्ट्रभर पसरलेले आहे. या वारीचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक वारीत सहभागी होत असतात. सामील होणारे प्रत्येकजण मनापासून रमतात, नाचतात, सेवा करतात आणि माऊली नामाच्या गजरात दंग होऊन जातात. आयुष्यात एकदा तरी वारी सोहळ्याचा अनुभव घ्यावा असं म्हणतात आणि माऊलींची इच्छा असेल तर तो योग जुळूनही येतो. यंदाच्या वर्षी अभिनेत्री गायत्री जाधव हिचा वारीमध्ये सहभागी होण्याचा योग जुळून आला.

गायत्रीने पुण्यात माऊलींची पालखी आली असताना त्यांचे दर्शन घेतले होते पण तिला रिंगण सोहळा अनुभवयाचा होता आणि अन्नदान देखील करायची इच्छा होती म्हणून गायत्रीने फलटणमध्ये एक दिवस वारक-यांसोबत वारीत चालण्याचा अनुभव घेतला आणि अन्नदान देखील केले.

वारीचा अनुभव, वारक-यांचा उत्साह आणि वारीमध्ये विठू माऊली आपल्यासोबतच असतात असं म्हणतात त्यामुळे हा अनुभव गायत्रीला अनुभवायाला मिळाला का, याविषयी विचारले असता, ती म्हणाली, “लहानपणापासूनच वारीविषयी मला प्रचंड आकर्षण होते. संपूर्ण महाराष्ट्रातून लोकं वारीसाठी आळंदीमध्ये एकत्र येतात आणि तिथून पुढे पंढरपूरला जातात. या सोहळ्याचं कोणी कोणाला आमंत्रण देत नाही तरी देखील मोठ्या संख्येने लोकं वारीमध्ये येतात आणि अतिशय शिस्तीने आपला प्रवास करतात. पंढरपूरला पोहचून दर्शन घेऊन आपापल्या घरी मुक्कामाला जातात. मला या मागचं रहस्य म्हणा किंवा त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या म्हणून मी या वर्षी वारी केली.

वारक-यांचा उत्साह तर कमालीचा असतो. यंदा पाऊस उशिरा सुरु झाला, तरी देखील अनेक शेतकरी पेरणीची कामे सोडून वारीत सहभागी झाले होते. अक्षरश: भान हरपून केवळ विठ्ठलाच्या नामात ही वारकरी मंडळी चालत असतात. त्यांच्यात आलेली उर्जा पाहून थक्क व्हायला होतं.

व्यक्ती लहान असो किंवा मोठी वारीमध्ये प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतो, माणसांमध्ये देव पाहण्याचा संदेश वारकरी देत असतात. माणुसकीविषयी समाजप्रबोधन करत असतात. माणसाला माणूस म्हणून जगण्याची दिशा देत असतात, त्यामुळे प्रत्येक क्षणाला प्रत्येक माणसामध्ये विठू माऊलींचे दर्शन होते, त्यांच्या असण्याचा भास जाणवतो आणि प्रत्येक वारकरी हे नक्कीच अनुभवत असेल.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये