ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पुण्यातील कोयता हल्ल्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत त्यामुळे…”

पुणे | Raj Thackeray – काल (27 जून) पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत धक्कादायक प्रकार घडला. एकतर्फी प्रेमातून तरूणानं भरदिवसा एका तरूणीवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच हा हल्ला होत असताना तेथील जमावानं बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरूणांनी देवदूतासारखं धावून येत पीडित तरूणीला वाचवलं. यासंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.”

“दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा”, असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये