ताज्या बातम्यापुणे

बाईपण ‘भारी देवा!’

नमस्कार सखींनो,
आज मी आपल्याशी काही हितगुज करणार आहे.. म्हणजे थोडक्यात गप्पा.. जो आपल्या सगळ्या महिलावर्गाचा लाडका विषय असतो.. आपल्याला काही फार तात्विक विषय किंवा एखादा मुद्दा लागतं नाही गप्पा मारायला.. नाही का ? आपण एकदा बोलायला सुरवात केली की ती गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत बोलू शकतो. गंमतीचा भाग सोडा, पण आपण स्त्री वर्ग खरंच कशात काही कमी नाही…

चला… आपल्या रोजच्या वागण्यातला एक विषय घेऊ, ते म्हणजे आपल्याच सोसायटीमधल्या मैत्रिणीचा आपल्याला फोन येतो, ‘अग खाली भाजीवाला आला की तेवढ कळव त्याचा आवाज वरती येत नाही’.. असं म्हणत आपण काही न विचारताच ती आदल्या दिवशीची कथा आपल्यापुढे वाचून दाखवते ‘अग काल एवढा गोंधळ घरात की भाजी आणायला जमलंच नाही, कुठे कुठे लक्ष द्यायचं ?’ मग दुसरीकडून आवाज येतो तो सुद्धा आपलाच असतो. खरं तर फक्त दुसऱ्याच्या आवाजात असतो.. तो म्हणजे असा की ‘अग खरं म्हणतेस तू एकदम आमच्या घरात फार काही वेगळं नाही, त्यात त्या कोरोनाच्या बातम्याने सुद्धा किती थैमान मांडलं आहे.’

मग आपण मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत बोलायला लागतो की त्यांनी काय सुधारणा करायला हवी… त्यांनी लोकांची कशी काळजी घेतली पाहिजे… इथपर्यंत म्हणजे विषय सुरू होतो ते भाजीपासून आणि पोहोचतो थेट देशाच्या विकासापर्यंत… पण सखींनो इथं खरच आपल्याला दोन मिनटं थांबून आपल्याच विचारांवर विचार करण खूप गरजेचं आहे. आपल्याच परिवारासाठी आपण आपल्या विचारांचं जे कवच आपल्याभोवती आणि परिवाराभोवती देत असतो ते खरंच खूप सामर्थ्यवान असतं ती क्षमता निसर्गाने खरंच एका स्त्रीमध्ये दिली आहे.

सख्यानो, आता मात्र मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते मात्र मनाचे कान करून ऐका.. आपण जेव्हा काही विषयांवर मैत्रिणीमध्ये सोसायटी ग्रुपमध्ये किंवा आपल्या मुलाच्या शाळेमधला जो ग्रुप असतो त्यांच्यासोबत जी चर्चा करत असतो, आपलं मत नोंदवत असतो, ते स्वतःच्या डायरीत नोंदवायला सुरवात करा त्यावर चिंतन करून विकासाच्या मार्गाकडे पाऊल उचला. त्या गप्पा, ती बडबड, तो वेळ वाया न घालवता त्याचा समाजासाठी आपल्या परिवारासाठी उपयोग विचार करूया. एक स्त्री शिक्षित झाली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. एक स्त्री सुदृढ झाली की संपूर्ण परिवार सुदृढ होतो हे का म्हणतात यांचा खोलवर विचार केला का कधी ? नसेल केला तर करायला सुरवात करा आणि करत असाल तर कृतीत आणा. कारण आताच्या जीवनशैलीत आपणही खूप भरकटत जात आहोत. स्त्रीला मुळात संवेदनशील बनवलं आहे पण त्या संवेदना आताच्या जीवनशैलीसोबत बोथट होत चालल्या आहेत.

त्यामुळे आपल्या मनातल्या विचारांच्या तलवारीला धार लावण्याची हीच ती योग्य वेळ आहे. नाहीतर आपल्या विचारांचा आतून येणार जो प्रलय आहे तो एखाद्या समुद्राच्या लाटेप्रमाणे भरती येईल आणि ओहोटी होऊन जाईल असं न होता आपण अंतर्मुख होऊन आपल्या परिवारासोबत आपला देश कसा विकसित होईल हे एकच उद्दिष्ट ठरवलं पाहिजे.

राजमाता जिजाऊंसारखं आपल्या विचार आणि कृतीमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. त्याच विचारातून त्याच कृतीतून आपल्या देशालासुद्धा संरक्षणाच कवच तयार होऊ शकतं त्याचं मूळ हे आपल्या संसारातच दडलं आहे. त्या संसारातच अखंड ब्रह्माण्डांच ज्ञान आहे आणि त्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी त्या शक्तीचा उपयोग शिवाला झाला. शिव +शक्ती = संसार.

एक महिला त्या अखंड शक्तीचे स्वरूप आहे. त्या शक्तीतून अणू रेणूसारख्या स्वरूपाला आकार देऊ शकते. म्हणूनच स्त्रीचा जन्म हा एकदा नाही तर एकाच जन्मात तीनदा होत असतो. पाहिला जन्म हा एक मुलगी म्हणून, दुसरा जन्म हा एक पत्नी म्हणून आणि तिसरा जन्म हा एक माता म्हणून होत असतो. जेव्हा एक मुलगी स्वतः एक आई होते तेव्हा त्या स्त्रीला पृथ्वीचा दर्जा दिला जातो. पृथ्वी म्हणजेच तिच्या गर्भात प्रत्येक जीव वाढत असतो.. तर मग आता आपणच ठरवायचं आहे की एका जन्मदात्रीने किती मृदू, संवेदनशील, आणि वेळेला कठोर व्हायला हवं ! ज्यावेळेस मातेचा गर्भ सगळं पचविण्याची ताकद ठेवणारा असेल तर त्यातून निर्माण होणारं बीज हे देखील किती चैतन्यमय आणि शक्तिशाली असेल, याचा विचार करा. त्याचबरोबर परिपक्व बीजाला येणारी फळे देखील तेवढीच उपयुक्त आणि मधाळ असतील.. मग यातूनच नव्या समाजरचनेचा पाया तयार होत असतो त्या विचारांचा प्रकाश हा सूर्यासारखा चैतन्य निर्माण करणारा असतो.

सख्यांनो तुम्हाला तुमच्यातली शक्ती काय आहे याची जाणीव स्वतः करून घ्यायची आहे. ती सुद्धा अंतर्मुख होऊन… यालाच तर संसार करता करता परमार्थ साधणे म्हणतात. त्यासाठी उपवास, व्रत ह्याची अजिबात गरज नसते.. गरज असते ती स्वतःमधली ऊर्जा जाणून घेण्याची. आज इथेच थांबते पण तुमच्याशी सतत गप्पा मारायला, हितगुज करायला येतच राहीन. मलाही तुमच्याशी बोलून एक नवीन ऊर्जा मिळत असतेच की…
तुमचीच सखी,
राजश्री

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये