सिनेसृष्टीत शोककळा! प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

पुणे | Ravindra Mahajani Passed Away – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे. तसंच रवींद्र महाजनी यांच्या निधनानं सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून रवींद्र महाजनी हे पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहत होते. तसंच शुक्रवारी रवींद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महाजनी यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना घरात महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रवींद्र महाजनी यांचा 2 ते 3 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.
रवींद्र महाजनी हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे मुंबईचा फौजदार, गोंधळात गोंधळ, लक्ष्मी, दुनिया करी सलाम असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.