महाराष्ट्रसंपादकीय

नेकलेस.. ने कलेस..

‘माझ्यामुळे तुमच्या शहराची नेकलेस परिधान केल्यासारखी शोभा आली. इथवर ठीक आहे पण माझा अधिक अंत न पाहिलात, तर बरे!’ सागराचे आत्मकथन मांडणारे हे ललित लेखन.

अबब काय हे! कोण कुणाला कुंपण घालून थोपवून धरतंय… एकीकडे अथांग विशाल असा उचंबळता मी रत्नाकर, आपल्या लाटांच्या लहरी लहरीने किनाऱ्यावर येऊन फुटून जातो. त्या सागराची गाज दणदणीत नाद करत राहते. किनाऱ्यावरील बंधारा लाटांचा मारा सतत झेलत राहतो पण तसूभर देखील मागे हटत नाही. माझं, सागराचं माथं भडकतं. खवळून पेटून उठतो नि भरतीच्या वेळी अक्राळविक्राळ लाटाचं रौद्ररूप धारण करून किनाऱ्याला
भेदू पाहतो.

एखादी उन्मत्त पिसाळलेली लाट किनाऱ्यावरून उंच उडी मारून एक सणसणीत सपकारा बाहेर मारून जाते. अशी एक, मग दुसरी.. तिसरी.. नि ऐन भरतीमध्ये एका पाठोपाठ एक. त्या नंतर हळूहळू जोर ओसरू लागतो, मी माघार घेऊ लागतो अन् पोटात साठवलेलं, गिळंकृत केलेलं, नकोसं असलेलं किनाऱ्यावर सोडून जातो.

जाताना, ‘बच्चमजी, येईन. एक दिवस असा येईन किनारा तोडून, फोडून पुढचा सगळाच भूभाग घशात घालीन’ अशी तंबी देतो. मला आवरण्याच्या नादाला लागू नका. होत्याचं नव्हतं करेन, मग समजेल सागर चीज काय असते ते. प्रलय काळ असेल तो प्रत्यक्षातला! मला माझी हक्काची जागा हवी. नैसर्गिक भूमीवर तुमचं अतिक्रमण इंचा इंचाने वाढवत नेलंय, मला मागे मागे हटवत तुमचं राज्य स्थापलंय… पण ते औटघटकेचं राज्य माझ्या ताकदीने, शक्तीने उलथवून टाकीन.तेव्हा बऱ्या बोलानं लवकरच शहाणे व्हाल नि आपल्या हैसियत मध्ये राहाल… ‘बॅक बे’ ला विसरा नि ‘गो बॅक अवे’ लक्षात घ्या.

अमृत मंथनाच्या वेळी माझ्यात दडलेली सगळी चौदा रत्ने बाहेर पडली. तरीही, शंख, शिंपले, अगणित प्रवाळ, मोती, मत्स्य संपत्ती आजही उदारतेने वाटत असतो. बदल्यात कोणतीही अपेक्षा न बाळगता. पण… पण कृतघ्न माणसा, तू मात्र माझी गटारगंगाच करून सोडलंस. सगळी गटारं माझ्यात सोडून, तुझी चिंता मिटवून माझ्या अस्तित्वाला काळं फासलंस. वरती मला न गिळता येणारा कचरा, प्लास्टिक, थर्माकोल, सारखे पदार्थ टाकून माझी अडचण केलीस.

मी वरचेवर किनाऱ्यावर आणून सोडून दिलं तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुन्हा तो कचरा टाकत राहिलात. गणपती, महालक्ष्मी विसर्जनाच्या वेळी तर किती कचरा टाकलात त्याला धरबंध नाही. तेल विहिरी, नैसर्गिक वायूंच्या शोध मोहिमेत माझा तळ खणून मला अक्षरशः विदीर्ण करून टाकलंत.

अगदी राम सेतूपासून ते सी- लिंक पर्यंतचे सगळे पूल माझ्या शरीरावर हूं का चूं न करता तोलून धरत आलोय. आणखी काही मदतीला माझी तयारी असतेच. तरीही तुमचं वागणं माझ्या बाबतीत उफराटं का? कुठं फेडणार ही पापं? अरे, तुमचेच पूर्वज म्हणत होते की, समुद्र स्नान करून पापं सारी धुवून जातात पण आता तुमची पापं ही धुवून निघण्यासारखी नाहीत बरं! त्याचं परिमार्जन न होण्यासारखंच आहे. सो, हे अनजान बालक, मेरी बात मान और मेरी शरण मे आना.

कारण मला, सागरालाच पिऊन संपवून टाकणारा अगस्ती ऋषी फक्त एकदाच झाला. तो आता पुन्हा होणे नाही. माझ्यामुळे तुमच्या शहराची नेकलेस परिधान केल्यासारखी शोभा आली. इथवर ठीक आहे पण माझा अधिक अंत न पाहिलात, तर बरे! अन्यथा ‘नेकलेस, ने कलेस’ असे म्हणत मला समर्पण होण्याची ती वेळ दूर नाही. बस, इतना खयाल रखना.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये