पुण्यात म्हाडाकडून पाच हजार घरांची सोडत

पुणे | Pune Mhada – पुणे (Pune) शहरात घर कमी किमतीत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून (Mhada) पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, यासंदर्भातील माहिती मिळाली आहे.
पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुण्यात घरांचीदेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील अनेक शहरांमधील नागरिक कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाल्यानं घरांची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. याच नागरिकांसाठी आता सुवर्णसंधी आहे.
आता पुण्यात पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. यासाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होईल. पुणे म्हाडासाठी विविध गट असणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे गट असतील. पुणे शहरासह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी सोडत निघणार आहे. अशी माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या 600 घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच 25 ऑगस्टपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे.