माझ्या वडिलांचं नाव वापरता?, दिल्लीतील वडिलांमध्ये हिंमत नाही का?; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

हिंगोली : (Uddhav Thackeray On Shinde Group) आज हिंगोलीतल झालेल्या जाहीर सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. “माझ्या वडिलांचं नाव का वापरता?, दिल्लीतील वडिलांमध्ये हिम्मत नाही का? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे.
डबल इंजिन सरकार, त्यात आता आणखी एक अजित दादांचा इंजन लागला आहे. अजून किती डब्बे लागणार आहेत. जणू यांची मालगाडी होत आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौबल इंजन. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करण्याचं कर्तुत्व नाही का?, अरे तुम्हाला नेते बाहेरचे लागतात. मात्र वडील माझे लागतात. पक्ष फोडला, पक्ष तोडला अन् वडील माझे वापरायचे, का तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मतं मागायची हिंमत राहिली नाही का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. माझे वडील चोरणार, इतर पक्षातील नेते चोरणार आणि आम्ही हिंदू असल्याचं सांगणार. कसली डोंबल्याची ताकद याला नामर्द म्हणतात. स्वतःकडे ना विचार, ना आकार आणि ना उकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेक जण गद्दार झाले, मात्र हिंगोलीतील जनता शिवसेना आणि भगव्याचे मागे राहिले. आता सुद्धा काही गद्दार असून, बेडकुल्या दाखवत आहे. पण या बेडकुल्यांमध्ये हवा आहे. ज्या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पूजा केली. पण तो फणा उलट्या फिरवून डसायला लागला. त्यामुळे पायाखाली साप आल्यास त्याला काय करायचं हे तुम्हाला कळतं. अरे बाबा तुला पुंगी वाजवली, तुला दूध पाजलं, सगळं वाया गेलं. नाव हिंदुत्वाचं, पण धंदे मटक्याचे. असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदू मानायचं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.